Tuesday, June 2, 2009

कधी कधी मन खूप उदास होतं.

कधी कधी मन खूप उदास होतं. विशिष्ट असं एखादं कारणही नसतं. पण रोजच्या धावपळीमुळे शरीरासह मनही थकतं. वाटतं, कशासाठी ही एवढी धडपड? नेमकं आपणाला काय हवं आहे, काय मिळवायचं आहे, हेही आठवत नाही. प्रत्येक गोष्टीला शेवट आहे. म्हणजेच ती गोष्ट निरर्थक वाटते. जेवत असताना जेवणाऱ्या व्यक्तीला पोट भरेपर्यंतच ताटातलं अन्न प्रिय वाटतं. एकदा का त्यात हात धुतला की उरलेल्या त्या अन्नाकडे पहावंही वाटत नाही. तशीच स्थिती प्रत्येक बाबतीत होत आहे. असं वाटून नेमकं काय करायचं हेच समजत नाही. वाटतं की, आता बस्स! खूप झाली धावपळ, खूप भोगले, खूप साहिले आणि जगलेही खूप. आता अंत करावा या जीवनाचा. हा (अ)विचार संपतो न संतोच लक्षात येतं की, संध्याकाळ झाली आहे, आणि आपण देवापुढचा दिवा अजुन लावलेला नाही.
मी पटकन उठतो, दिव्यातील जुनी वात काढून टाकतो. स्वच्छ कापसाची शुभ्र नवी वात करून तेलात भिजवतो व दिवा लावतो. सारा देव्हारा प्रकाशमय ! सुंदर ! सात्वीक. त्या ज्योतीच्या लख्ख प्रकाशाने मनावरील चिंतेची काजळीही दिसेनाशी होऊ लागते.
एवढ्या छोट्याशाच गोष्टीमुळे ईश्वराचे अस्तित्व पटू लागते. आणि मी ईश्वराची विशालता आठवून दोन्ही हात जोडतो व डोळे बंद करतो.

No comments:

Post a Comment