Friday, June 5, 2009

माझी वेदना तुझी व्हावी.


माणसांशी जवळीकता निर्माण झाली की, लक्षात येतं - हाही जीव आपल्यासारखाच दु:खी आहे. खरं म्हणजे अशी असंख्य माणसं असतील की, प्रत्येक क्षणाला त्यांच्या डोळ्यात लपून बसलेला अश्रूंचा थेंब बाहेर येऊ इच्छित असेल, डोळ्यातून मुक्त होण्यास धडपडत असेल. मात्र माणसं जाणून-बुजून स्वत:च्या अश्रूकडेच दुर्लक्ष करताना दिसतात.
मला असं वाटायचं की, हे फक्त मलाच जमतं. पण चार माणसाचं सान्निध्य लाभलं आणि माझा गैरसमज दूर झाला.
अश्रू लपवीत असताना माणूस उगाच स्वत:ला त्यागी समजत असतो. आपल्या डोळ्यातील समुद्र पाहून आपला जीवलग दु:खी होईल, असेच त्याला वाटते. पण, त्याला काय माहित की, त्याच्या जीवलगाच्या डोळ्यात तर अश्रूचा झराच आहे. जो क्षणा-क्षणाला त्याचे हृदय ओलावत आहे.
नदीचं समुद्राशी मीलन झाल्यानंतर नदीही विशाल बनते. तीच वेगळं असं अस्तीत्व उरत नाही. त्याचप्रमाणे जीवाभावाच्या माणसाच्या अश्रूत आपले अश्रू मिळाले तर आपणही एकमेकात सामावुन जाऊ.
मी त्यागी बनू शकत नाही. अश्रू लपविणे हा त्याग नसून भ्याडपणा वाटत आहे. आणि हा भ्याडपणा मला असह्य होत आहे. त्यागाची भावना दूर सारून माझे अश्रू तुझ्या अश्रूत असे मिसळावेत की, तुझे दु:ख माझे व्हावे अन्‌ माझी वेदना तुझी व्हावी.

No comments:

Post a Comment